तरही गझल
गझलेची पहिली ओळ, कवी गंगाधर मुटे यांच्या “स्वदेशीचे ढोंगधतुरे” या कवितेची….
एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
दुसरा कोणी रेलखाली तडफडून मेला काल
जिवंत वेडा सुंदर जगला मस्तीत नाचत गात
नातीगोती माया प्रीती झटकून मेला काल
सदासर्वदा सिग्नल तोडे बाईकवरचा स्वार
पुलाखालच्या हातगाडीस धडकून मेला काल
पाऊस असा धो धो पडला रस्त्यावरती खड्डे
कुणी डोळस खड्ड्यात त्या धडपडून मेला काल
पतंग होता आंधळा म्हणुन दिसले नाही त्याला
झेप घेऊन मेणबत्तीवर जळून मेला काल
गझल मात्रावृत्त (मात्रा २८)