जगावयाला आनंदाने वर्तमान मम् अतीव सुंदर
भूतही सुंदर भविष्य सुंदर वर्तमान मम् सजीव सुंदर
येणारा क्षण हरेक आहे माझ्यासाठी दिव्य पर्वणी
समृद्धी अन सुख शांतीचे चित्र रेखितो भरीव सुंदर
अंतरातली शुचिता उजळत जाई कणकण मम् देहातिल
प्रकाशात आत्म्याची मूर्ती हवी तशी मज घडीव सुंदर
तापतापता नीर तळ्यातिल बदके फिरती तप्त वाळुवर
राजहंस विहरण्या जलावर नाचत येतो वळीव सुंदर
निळे पारवे धुके लपेटुन पहाट वाऱ्यासंगे लहरत
नेणिवेतल्या सुखद स्मृतींनी भरुन काढते उणीव सुंदर
गझल मात्रावृत्त (मात्रा ३२)