उठाठेव – UTHAATHEV


कोण पोचले कोणाआधी हिशेब असले तूच ठेव ग
तुझ्या हिशेबांचे वारांचे, कधीच नव्हते मला भेव ग

अतिथी देवासमान असतो, तुला न कळला हा व्यवहार
निश्चय जाणुन व्यवहारातिल भुकेल्यातला पहा देव ग

काजळणे कुढणे घुसमटणे, यातुन मुक्ती मिळावयास
घनतिमिरातिल समईमधल्या फुलवातीसम शांत तेव ग

लष्करच्या भाकऱ्या बडविणे, जगण्यासाठी अवघड फार
त्यापेक्षा तू अर्धी चतकुर राखुन भाकर मस्त जेव ग

जरी अडनिड्या वयाचा न तो, तुला पाहण्या अडतो रोज
पडावयाचे भय ना तुजला पण पदराचा खोच शेव ग

लपवुन कोठे सत्य लोपते अता घालणे झाकण बास
झाकपाक करण्या कवयित्री नकोच नसती उठाठेव ग

दलाल वाणी अडते येती लोटा घेउन म्हणणाऱ्यास
दाव सचोटी व्यापारातिल कळण्यासाठी देवघेव ग

गझल मात्रावृत्त मात्रा ३१


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.