नागिण जणु तू तव चालीची सळसळ झालो
तुझ्या दुपट्ट्यातिल ढाक्याची मलमल झालो
तुझे दुधारी वर झेलण्या कातळ झालो
सुगंध प्राशुन त्या वारांतिल परिमळ झालो
मिटल्या पापणकाठी तव मी अश्रू होतो
नेत्र उघडता तू तव गाली ओघळ झालो
तुझी सुई अन तुझाच धागा तुझेच टाके
रंगबिरंगी अनेक पदरी वाकळ झालो
निर्झरबाला बनून येता तू मम हृदयी
शुद्ध वाहत्या शीत जलाची खळखळ झालो
पणतीमधल्या माझ्यावर तू नजर फिरविता
काजळुनी मी सुलोचनी तव काजळ झालो
आरतीतुनी स्फटिक रुपाने उडून जाण्या
शुभ्र कर्पुरा समान निर्मळ निर्जल झालो
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)