सम्यक श्रद्धेवर मी जगते सृष्टी माझी जिवंत आहे
जगावयाची जगवायाची माझी भाषा ज्वलंत आहे
म्हणोत कोणी काही मजला लिहीत राहिन सुरेल गाणी
गाण्यांमधल्या बकुळ फुलांचा परिमल कीर्ती दिगंत आहे
उंच कड्याच्या टोकावरुनी निळ्या नभाला बांधिन झूला
सभोवताली पहावयाला मला कुठे रे उसंत आहे
दोन पावलांपुरती भूमी बघून रोवे पाय अता मी
पंख पसरुनी झेप घ्यावया खुणावतो आसमंत आहे
हृदय फुलांचे हलता झुंबर वसंत वाऱ्याच्या स्पर्शाने
अक्षरातुनी प्रेम पेरणे सुनेत्रास या पसंत आहे