प्रतिभेने मज माध्यम दिधले काव्य व्यक्त व्हावया
अंतर म्हणते लिही लिही मन बंधमुक्त व्हावया
प्रिय मज माध्यम काव्यच आहे अन्य माध्यमाहुनी
भजते जपते शब्दाक्षर मी काव्यभक्त व्हावया
काळोखाला उसवुन रगडुन घडीव पाट्यावरी
गाळत बसते भाव गडद मी स्वच्छ रक्त व्हावया
पहाट सुरभित शीतल शुभ्रा प्रसाद देण्या शुद्ध
ओंजळीत मम दव सांडविते एकभुक्त व्हावया
झरते पडते अधांतरी जल कधी राहते काय
पचवुन विषमय रंगांना ते पडे रिक्त व्हावया
निर्भयात मी पळपुट्यात पण स्वतःस पाहे रोज
स्वतः स्वतःवर प्रयोग करिते नित्य सक्त व्हावया
अशक्य अवघड खरेच नाही लिहिणे सोपे मला
कवयित्री मी अनवट लिहिते क्लिष्ट फक्त व्हावया
मात्रावृत्त (१६/११) २७ मात्रा
प्रत्येक चरणात १९ अक्षरे
१२ व्या अक्षरानंतर यती
ओळी १४
वृत्त- शार्दूलविक्रीडित