खिडक्या दारांमधून येतो नाचत वारा घरात माझ्या
ऊन कोवळे सोनसळीचे लहरत फिरते उरात माझ्या
कधी कावळा कधी पारवा हक्काने अंगणात येतो
पानांमध्ये लपून कोकिळ सूर मिळवितो सुरात माझ्या
फुलका भाकर रोट चपाती दशमी पोळी खाऊ घालिन
पीठ मळाया स्वच्छ दांडगी कट्ट्यावरती परात माझ्या
निळी तिचाकी निळीच छत्री निळा सावळा घन ओथंबुन
अजूनसुद्धा टिकून आहे आठवणींच्या पुरात माझ्या
मोरपिशी रंगाचा शालू पदरावरती मोर नाचरा
झरझरणारे कलम देखणे मोरपिसाचे करात माझ्या
गझल मात्रावृत्त मात्रा ३२