प्याले भरून प्याली ओठी धरून प्याली
बिंबास कांचपात्री बघते झुकून प्याली
न्हाऊन सप्तरंगी माझी तरूण प्याली
लाखो जिने बिलोरी आली चढून प्याली
गझलेत पेय उसळे फेसाळत्या नशेचे
गाठूनिया तळाला आली तरून प्याली
केले जरी रिकामे फटक्यात रांजणाला
त्याला पुन्हा भराया अजुनी टिकून प्याली
नसता कुणी पहाया मस्तीमधे स्वतःच्या
नेत्रात दो शराबी जाते बुडून प्याली
मातीत अक्षरांचे अंकूरण्यास मोती
उतरे पुन्हा धरेवर बनुनी वरूण प्याली
झिंगून शेर सारे होता पुरे दिवाने
साकी तुला ‘सुनेत्रा’ देते भरून प्याली
शब्दार्थ
प्याली – सोन्याचे,नाजूक कोरीवकाम केलेले सुबक सान पेयपात्र