पर्णकंकणांचे किणकिणने मला सांगते शिशिरामागुन वसंत येतो
गडद पारव्या तलम धुक्यातुन डोलत झिंगत दवास प्राशुन वसंत येतो
चिवचिव कलरव खग फांद्यांवर बोल बोलती दिन सोनेरी आले आले
तेव्हा गरगर स्वतःभोवती लहरत थिरकत वाजवीत धुन वसंत येतो
हलधर शेतामध्ये फिरुनी इच्छांसंगे बीज पेरता घाम सांडता
दहिवर शिंपित मातीमधल्या भिजल्या रुजल्या कणकणातुन वसंत येतो
बदल बदल काळाच्या संगे गुराख्यास जी मुरली सांगे त्या मुरलीवर
फिरता बोटे सहजपणाने सुरावटीवर लयीस पकडुन वसंत येतो
अखंड धाग्यावर प्रीतीच्या पतंग माझा मजेत उडतो निळ्या अंबरी
त्याच पतंगावरी बसूनी संधीकाली शुभ्र घनातुन वसंत येतो
लोभ अहं मद मत्सररूपी कषायकाष्ठे रचुन गोवऱ्या थंडीमध्ये
ऊब मिळाया कष्टकऱ्यांना लाल गुलावर काडी ओढुन वसंत येतो
मक्त्यामध्ये नाव लिहाया जागा नाही गझलकारिणी म्हणते जेव्हा
वेलीवरच्या गझल कळ्यांना नकळत त्यांच्या प्रेमे चुंबुन वसंत येतो