जिन राहतो माझ्यासवे माझ्या घरी मम अंतरी
सांगू कशाला हक्क पुद्गल सांडल्या शब्दांवरी
मी पाहिल्या अन ऐकल्या गोष्टी किती भूतातल्या
पण वर्तमाना जागते जगण्या कथा लिहुनी खरी
मधुचंद्रमा पूर्णाकृती माथ्यावरी घन सोबती
दुग्धातल्या बिंबासही भिजवावया आल्या सरी
फुलुनी कळ्या गंधाळता जाईजुईचा ताटवा
कोजागिरीच्या अंगणी शांती इथे नांदे खरी
मौनातली झाडे पुन्हा करतात जेव्हा लावणी
येते परी हस्तासवे ओतावयाला घागरी
पाऊस वेडा जाहला झाली धरित्री जांभळी
रानातली फुलपाखरे उडती कशी काट्यांवरी
कोंडा भुकेला मस्त अन धोंडा निजेला मज पुरे
राखावया गाई गुरे अधरी सुनेत्रा बासरी