पाऊस पावसाळ्यात पडून जातो… पावसाचा ऋतू असतो…
तेव्हाच पाऊस पडून जातो..
जमिनीत मुरतो..शेतात पडतो… रानावनात कोसळतो…
कधी माती वाहून नेतो…
कधी विहिरीतले मृत झरे जिवंत करतो…
घरांवर छप्पर फाडून कोसळतो…
कधी कधी मग नद्यांना पूर येतो…
काठावरची गावे जलमय होतात… धरणे जोहड भरून जातात..
कधी कधी पावसाचा ऋतू पण कोरडाच जातो..
पाऊस पडतच नाही…
शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळवतो पाऊस…
कोरडा दुष्काळ पडतो…
विहिरी नद्या तलाव तळी आटून जातायत…
नद्या वाळूचे बेट बनतात..
साठवलेले पाणी पुरवून पुरवून वापरले जाते..
आसू येतात माणसाच्या डोळ्यात…
डोळ्या आतले पाण्याचे हौद मोकळे होत जातात..
आसू पुसून माणसे मोकळी होतात… कधी स्वतःचे कधी दुसऱ्याचे ..
डोळे भरून भरून आसवे वाहू लागतात.. कधी पापणीच्या आत सुकून जातात…
एखादा थेम्ब दिसतो कधी पापं काठावर..
आता आसू जरा पुन्हा पुन्हा येत राहिले तर येऊ द्यावेत..
वाहून जाऊ द्यावं त्यांना… देह भिजून जाऊदेत चिंब चिंब…
अश्रू साठवून ठेवण्यास धरणे जोहड तलाव नसतात..
की ते पुन्हा कधी वापरता यावे कुठेतरी.. खोटे खोटे रडायला…
अश्रू अश्रू असतात..पाऊस पाऊस असतो…
अश्रू आणि पावसाचं नातं असं वेगळं वेगळं असलं
तरी त्यांचं आतून कुठेतरी मैत्र असतच असतं ….