अंतरीचा सोनचाफा तू तया पाहून घे
सौरभाला लूट त्याच्या कुंतली माळून घे
कुंतलांना सांग कुरळ्या वारियावर लहरण्या
मोकळे होऊन त्यासम मस्त तू गाऊन घे
नीर शीतल साठलेले लिंब हो काठावरी
चंद्रकिरणांच्या सरींनी चिंब तू न्हाऊन घे
सोडुनी पाण्यात पाया बैस तेथे क्षणभरी
विसरलेल्या पैंजणांना तू पुन्हा बांधून घे
बिंब तव पाण्यात सुंदर पाहुनी आश्चर्य का
ते तुझे आहेच आहे त्यास तू चुंबून घे
लगावली – गालगागा/ गालगागा/ गालगागा/ गालगा/