मातीलाही स्मरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो
वाऱ्यामध्ये तरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो
उदकचंदनी रेशिमधारा झेलत असता अंगागावर
घटात भूमी भरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो
खडीसाखरेसम गारांची जलदांमधुनी वृष्टी होता
मातीसुद्धा वरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो
तापतापुनी धूप जाळुनी फळाफुलांनी बहरुन येण्या
धरा सावळी धरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो
तबक नभाचे दीप विजेचा अक्षतरूपी थेंब प्राशुनी
सचैल पृथ्वी झरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो
गझल – मात्रावृत्त (मात्रा ३२)