गरजेपुरते बोलाया उच्चारण उरले नव्हते
उधारीतले श्वास घ्यावया तारण उरले नव्हते
रंगपंचमी खेळायाला साजण उरले नव्हते
इंद्रधनू रेखाया क्षितिजी श्रावण उरले नव्हते
भूकंपाचा फेरा आला भूमीताई खचली
गाई गुरांना बांधायाला दावण उरले नव्हते
बाप न उरला माय न उरली घर ते भणभणलेले
थांबायाचे कोणासाठी कारण उरले नव्हते
सुस्त अजगरे पडून होती पण सळसळण्या तेजे
इच्छाधारी नाग आणखी नागण उरले नव्हते
मुंडण करुनी येता तू गे गजरा माळायाला
कृष्ण कुंतलांचे सखये संभारण उरले नव्हते
तीन करंज्या भरुनी तळल्या कढईमधल्या तेली
चवथीमध्ये भरण्यासाठी सारण उरले नव्हते
गझल मात्रावृत्त – मात्रा २८