होते न काही बोलुनी पण बोलले तर पाहिजे
जोडायला नाही कुणी पण जोडले तर पाहिजे
माझे मला झाले पुरे आता पुरे करवादने
जे ना बरे ते काम कोणी रोखले तर पाहिजे
जगणे जरी काट्यावरी काट्यातली पाहू फुले
पण झाड वठले बाभळीचे छाटले तर पाहिजे
ते यायचे खदडायला अंदाज अमुचा घ्यायला
आतातरी वाईट त्यांना वाटले तर पाहिजे
नाचावया ते सांगती आगीमधे दोरीवरी
नाचून ना कंटाळले पण नाचले तर पाहिजे
म्हणतात ते आम्हा सदा, आहे बरे सांगा खरे
हृदयात अमुच्या प्रेम थोडे साठले तर पाहिजे
झाल्या कमानी ताठ ह्या डोक्यांस धक्के द्यावया
डोक्यांस या सांभाळण्या पण वाकले तर पाहिजे
वृत्त – मंदाकिनी, मात्रा २८
लगावली – गा गा ल गा/गा गा ल गा/गा गा ल गा/ गा गा ल गा.