मुसळधार पावसात पांघरून गारवा
वळचणीस थांबलाय चिंब चिंब पारवा
गार गार घन टपोर नाचतेय अंगणी
जाहला सुस्नात मुग्ध पारिजाति कारवां
तरुतळी बकुळ फुले सुगंध मंद उधळिती
त्यांस अंथरून दाट अंगणास सारवा
सांजरंग मिसळलेत निर्झरात नाचऱ्या
जलतरंग वाजवीत मरुत गाय मारवा
मेघ बरस बरसतात मोतिरूप जोंधळे
मौक्तिकांस त्या चुरून पाखरांस चारवा
गझल – अक्षरगण वृत्त (मात्रा २३)
लगावली – गालगाल/गालगाल/गालगाल/गालगा/