कसे काय बोलू, कसे काय साहू, मला हे कळेना, तुझ्याशी जुळेना, खरे मैत्र माझे, खरी प्रीत माझी, सुनेत्रा…
किती सोसला मी, तुझा हा दुरावा, तरी का वळेना, तुझ्याशी जुळेना, खरे मैत्र माझे, खरी प्रीत माझी, सुनेत्रा….
जरी पावसाचा टिपुस ना मिळाला, उन्हाळ्यात तगले, तुझ्या आठवांना जपोनीच फुलले, किती यत्न्य केले जगाया…
निळ्या उष्ण झोतात न्हाले बुडाले, तरी पाघळेना, तुझ्याशी जुळेना, खरे मैत्र माझे, खरी प्रीत माझी, सुनेत्रा….
समुद्रात लाटा उरी पेलुनी मी, भविष्यास भूतास काठास जाळून राखेस कोळून प्याले, नशेने उडाले…
नभी उंच गेले, घनी वीज झाले, तरी सळसळेना, तुझ्याशी जुळेना, खरे मैत्र माझे, खरी प्रीत माझी, सुनेत्रा….
मनाच्या भुयारी, तळी सुप्त इच्छा, कधी दाबलेल्या, भुरी जळमटेही वरुन लोंबणारी, सुकी जीर्ण पोती भुश्यांची…
भुसा तो जळोनी, मृदुल भावनांचा, झरा खळखळेना, तुझ्याशी जुळेना, खरे मैत्र माझे, खरी प्रीत माझी, सुनेत्रा….
जरी खोड वठले, मला ध्यास आहे, फुटाव्यात फांद्या, कळ्यांनी फुलावे, नवे रंग ल्यावे, जुनी कुंपणे ती सुनेत्रा…
पुन्हा पालवाया, खुळा पावसाळा हिवाळा टळेना, तुझ्याशी जुळेना, खरे मैत्र माझे, खरी प्रीत माझी, सुनेत्रा….
अक्षर गण वृत्त – मात्रा ६५
लगावली – लगागा / १३ वेळा