पाऊस हा येणार रे भिजवायला मजला पुन्हा
सांगावया गोष्टी जुन्या रडवायला मजला पुन्हा
त्या वादळी रात्रीतले ते भेटणे माझे तुझे
आहे पुरा तो चांदवा हसवायला मजला पुन्हा
काहीतरी कोठेतरी घडलेच होते त्याक्षणी
सांगू नको भलते असे फसवायला मजला पुन्हा
शृंगार ना केला तरी गंधार होता अंतरी
शृंगारली होती धरा खुलवायला मजला पुन्हा
सांजावली होती धरा हातात होती बासरी
तू गायला होतास का निजवायला मजला पुन्हा
वृत्त – मंदाकिनी, मात्रा २८
लगावली – गा गा ल गा/ गा गा ल गा/ गा गा ल गा/ गा गा ल गा.