विंध्यगिरीवर श्यामल सुंदर जलद दाटले पुन्हा
गोमटेश बाहुबलीवर जल मुक्त सांडले पुन्हा
हाती चंबू सान दुधाचा टोकावर गुल्लिका
धार ओतता धवल दुग्धमय घन कोसळले पुन्हा
नीर क्षीर चंदन अन केशर अष्टगंध औषधी
प्रपात धो धो सुवर्ण हळदी लोट उसळले पुन्हा
पारिजात मोगरा चमेली चंपक जाई जुई
सुरभित पुष्पांनी भरलेले मेघ बरसले पुन्हा
अखंड रज्जूवर प्रेमाच्या झुलते पंचारती
औक्षण करण्या बाहुबलीचे दीप नाचले पुन्हा
मात्रावृत्त – १६/११ (२७ मात्रा)