मधाळ प्रीती वचनामध्ये उतरू दे ग
सुकलेले सुख जळणामध्ये उतरू दे ग
बुडून जाता भरतीच्या या उचंबळात
मधुरा भक्ती भजनामध्ये उतरू दे ग
दे चटका डाळीस शिजवुनी जड कढईत
रंग गुळाचा पुरणामध्ये उतरू दे ग
जिरे मिरे वाटून फोडणी दे डाळीस
स्वाद तयांचा वरणामध्ये उतरू दे ग
रदीफ माझ्या गझलेमधले वादातीत
पदे आरत्या कवनामध्ये उतरू दे ग
खणखणणारी पंचधातुची सोनियाची
घनसर नाणी चलनामध्ये उतरू दे ग
मौक्तिकमाला टपटप झरण्या लेखणीतुन
सजल गडद ढग नयनामध्ये उतरू दे ग
शिशिर प्रभाती धुके मलमली निळसर श्वेत
दिशादिशांच्या वसनामध्ये उतरू दे ग
प्रीतिसंगमी उधाणलेली कृष्णामाय
स्नानासाठी धरणामध्ये उतरू दे ग
चरण मुनींचे प्रक्षाळाया काव्य माझे
भाव शुद्ध हर चरणामध्ये उतरू दे ग
गारठलेल्या जीवांसाठी सांजपंखी
ऊन केशरी कुरणामध्ये उतरू दे ग
फुलबागेतिल मौन सुगंधी मरुत लहरी
शीतल चंचल पवनामध्ये उतरू दे ग
मस्त जादुई झुले बांधण्या सप्तरंगी
तीर कामठा गगनामध्ये उतरू दे ग
मुनीजनांना हितकर वाटे सैंधव मीठ
ती हितकरता लवणामध्ये उतरू दे ग
मूक पशूंचे जाणायाला लेश्यारूप
भाव तयांचे ग्रहणामध्ये उतरू दे ग
जुनी पुराणी गीते काही विसरायास
गझल गझाला भवनामध्ये उतरू दे ग
जीवनदायी जागृत प्रज्ञा सुप्त प्रतिभा
कलेकलेने सृजनामध्ये उतरू दे ग
गझल मात्रावृत्त (मात्रा २३)