चांदणचुरा – CHANDANCHURA


चांदणचुरा

जैसे शारदियेचे चंद्रकळे |  माजी अमृतकण कोवळे |

ते वेचिती मने मवाळे | चकोर नलगे | |

तियापरी श्रोता | अनुभवावी हे कथा |

अति हळूवारपणा चित्ता | आणुनिया | |  (संत ज्ञानेश्वर )

सामान्य संसारी जगात रमणाऱ्या आपल्यासारख्या कवींच्या काव्यात विशुद्ध अशा संत काव्यातली माधुरी उतरणं अशक्यच आहे. पण अस्सल कवी मन मग ते सामान्य संसारी असो की, असामान्य संसारी असो त्याच्या काव्यातून जे काही चांदणं झरतं ते त्याच्यासारख्या रसिकांना भुरळ पाडीतच असतं. हळूवार मनाने ते काव्याचा आस्वाद घेतच असतात.

 

चांदणचुरा हा गझलकार श्री इलाही जमादार यांचा फक्त मुक्तके आणि रुबायांचा संग्रह. शरदाचे चांदणे इतर ऋतुतल्या चांदण्यांपेक्षा जरा जास्तच मृदुल असते. कोवळे असते. या चांदणचुऱ्याच्या वर्षावाने मोहरलेल्या अवनीचं सौंदर्य प्राशायला कवीच्या देहामनाला जणू सहस्त्रावधी डोळे फुटतात. अंगावर लक्ष लक्ष रोमांच उभे राहतात. कवीचे मन मग आकाशीच्या त्या चंद्राला आवेगाने मिठीत घेतं. मग या झंझावाती कवेत जे काही उरतं तो असतो चांदणचुरा !

‘चांदणचुरा’ या गझलेमधील एका शेरात कवी इलाही म्हणतात.

आवेगाने मी चंद्राला अशी मारली मिठी

झंझावाती कवेत माझ्या उरला चांदणचुरा.

या चांदणचुऱ्याच्या स्पर्शाने कवीच्या लेखणीला चंद्रकिरणांचे धुमारे फुटतात. चांदणचुऱ्याच्या रूपातल्या मुक्तकांचा आणि रुबायांचा सडा पडतो.

चांदणचुरा या संग्रहात एकूण २०३ मुक्तके आणि रुबाया आहेत. ही सर्व मुक्तके सामाजिक शृंगारिक आध्यात्मिक अशा सर्व विषयांना स्पर्श करणारी आहेत. चांदणचुऱ्याच्या प्रारंभी मनोगतात श्री इलाही जमादार म्हणतात;

“ग़ज़ले इतकाच रुबाई व त्याहून अधिक मुक्तक (कतआ ) हा काव्यप्रकार मला आवडतो. ग़ज़लेचा शेर सुभाषितांइतकाच प्रभावी असला तरी मुक्तक व रुबाईसारखा त्याला स्वतंत्र अशा काव्यप्रकाराचा दर्जा नाही. घागरमे सागरही नही तो पुरा अंबरभी सामावून घेण्याची क्षमता रूबाई वा मुक्तकात असते. ”

या पुस्तकात त्यांनी रुबाई व मुक्तक यांच्या तंत्राबद्दलची माहिती ही दिली आहे.

रुबाईची अखरम मधील बारा वृत्ते आणि अखरब मधील १२ वृत्ते मिळून २४ वृत्तांचे कोष्टकही सुरुवातीला दिलेले आहे. ज्यांना गझलेचे तंत्र अवगत आहे त्यांना तंत्राबद्दलची माहिती आत्मसात करणं फारसं अवघड जाणार नाही. एक रसिक वाचक आस्वादक या नात्याने यातील चंदन चुऱ्याचा आस्वाद घेता घेता इतरांनाही तो घेता यावा यासाठीच हा शब्द प्रपंच.

‘ वीणा पुस्तक धारिणी अशा शारदेच्या कृपाप्रसादाने कवी कालिदास महाकवी बनला. आपण सारे छोटेमोठे कवी शारदेच्या कृपाप्रसादानेच काहीबाही लिहित असतो हे सांगणारे कवीचे मुक्तक.

मी शब्दांसाठी कधीच अडलो नाही
अन शब्दांना मी कधीच नडलो नाही
घडवावी मूर्ती तसे न घडते कविता
ना घडली कविता मीही घडलो नाही

कवीला शब्दांसाठी कधी अडून बसावे लागत नाही. अन शब्दांना तो नडतही नाही. कविता कशी घडते? शब्दांच्या ढिगाऱ्यातून शब्द शोधून जोडून ती बनत नाही. छिन्नी व हातोड्याने ठाकठोक करून घडवून ती बनत नाही. ती तर आतूनच उमलून येते. कवितेच्या जन्माबरोबर कवी स्वतःही कसा घडत जातो याचे जणू रहस्यच कवीने उलगडून सांगितले आहे.
अशी ही आधारासाठी शब्दांचे बोट धरून अलगद श्वासातून बाहेर आलेली कविता असते तरी कशी?

शब्दांच्याही पल्याड असते माझी कविता
केवळ रसिकालाही दिसते माझी कविता
दिसते म्हणजे तशीच असते असेही नाही
आभासाच्या गावी वसते माझी कविता

अशी ही शब्दांचं माध्यम पकडून आलेली कविता, तिचा स्वभाव, तिची व्याप्ती केवळ त्या शब्दांच्या अर्थापुरती सीमित नसते. तिचा पसारा तर शब्दांच्याही पल्याड गेलेला असतो. जो खरा रसिक असेल त्यालाच हा पसारा पाहता येतो. ती जशी दिसते तशीच ती असते असे नाही. तिचं अंतरंग तिच्या बाह्यरूपापेक्षा खूप वेगळंही असू शकत. अश्या या आभासाच्या गावी वसणाऱ्या केवळ रसिकालाच भावणाऱ्या कवितेचं मोल सोन्याचांदीपेक्षाही अनमोल असतं. पण या कवितेला बाजारात मांडायचं असेल तर मात्र कवीला हृदयावर दगड ठेऊन तिच्यातल्या शब्दांसंगे खडाजंगी करावीच लागते.

मी शब्दांसंगे अविरत भांडत असतो
अन अर्थाचा मी काथ्या कांडत असतो.
जे मुशीतुनी तावून सुलाखून निघते
ते कांचन मी बाजारी मांडत असतो.

शब्दांशी भांडण म्हणजे त्यांची तोडफोड करावी लागते. त्यातून निघणाऱ्या वेगवेगळ्या अर्थावर काथ्याकूट करावाच लागतो. त्यांना मुशीत ओतावच लागतं. अन मग यातून तावून सुलाखून संस्कारमय घडून आलेलं जे कांचन असतं तेच बाजारात मांडावं लागतं. मग जाणकारांकडून त्याचं मोल ठरवलं जातं. कवितेला बाजारात मांडण्यासाठी कवीला या गोष्टी नको असल्या तरी कराव्याच लागतात. पण त्याच्या हृदयात मात्र भावफुलांचा वर्षाव सतत होतच असतो. या भावगंधात भिजलेल्या बकुळफुलांचा स्वभावच असा की ती जिथं जिथं पडतील त्या जागेला स्वतःचा गंध बहाल करतील. मातीत मिसळली तरी मातीला सुगंधित करून सोडतील. जाळून राख बनली तरी राखेतूनही सुगंधच उधळतील. कशातही रूपांतरित झाली तरीही त्यांच्या आभासातून त्यांचा सुवास त्यांचा भाव कवी मनात दरवळत राहील.

गर्जेल तो पडेल काय? या म्हणीप्रमाणे मी असे करेन तसे घडवेन म्हणून नवल घडत नाही.
घडवून कधी का नवल घडतसे वेड्या
जुळवून शब्द तर गझल पडतसे वेड्या
आकार दिल्याने सत्य मरोनी जाते.
अन सत्यावरती पटल चढतसे वेड्या

जे खरे आहे अस्सल आहे ते निराकारच असते. संपूर्ण सत्याला शब्दात कधीच बांधता येत नाही. त्याला व्यर्थ आकार देण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा आत्मा मरतो. त्यावर फक्त पटल चढतं. जो निराकार आहे त्याचा फक्त अनुभव घेता येतो. पण तो यथार्थपणे व्यक्त करता येत नाही.

कळी कळी अन फुलात पाहशील तर कळेल
चांदण्यातल्या दवात नाहशील तर कळेल
शब्द ताजवा तुझा अन शब्द जोगवा तुझा
प्रेमगीत स्पंदनात ऐकशील तर कळेल

वाऱ्यावर पावसावर कोसळणाऱ्या प्रपातावर कोकिळेच्या स्वरावर प्रेम करायला माणसाला सांगावं लागत नाही. जे जे निखळ आहे शुद्ध स्वरूपात आहे त्याकडे मानवी मनाची ओढ उपजतच असते. म्हणूनच मानवी मन अशा आदर्श हृदय लाभलेल्या प्रियकर प्रेयसीच्या शोधात असतं. वास्तवात नाही मिळालं तर स्वप्नात का होईना पण ते त्याचाच शोध घेत असतं.

आश्विनातील चांदण्यांनी शिंपलेले स्वप्न तू
मी तुझ्या ना ओळखीचा अन मला अनभिज्ञ तू
….
रागिणी तू कोकिळेने गाईलेले स्वप्न तू
अशी ही स्वप्नवत एकमेकांना अनभिज्ञ असणारी प्रेयसी तिचा आभास मात्र सतत होत असतो. अशी प्रियतमा म्हणजे स्वप्नामधला विलास असतो.

परमेश्वराच्या शुद्ध निराकार रूपाकडेही मानवी मनाची ओढ उपजतच असते. जरी ही कल्पना स्वप्नवत असली तरी तसे बनण्याची ओढ उपजत असते खरी असते. पण तसं बनणं म्हणजे एक तपस्या असते. साधना असते. त्यासाठी गुणदोषांनी भरलेल्या माणसावर ही प्रेम करावं लागत.गुणांवर प्रेम कुणीही करतं पण त्याच्या दोषांसकट एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे खरं प्रेम. माणसं, स्त्रीपुरुष एकमेकांवर प्रेम करतात, द्वेषही करतात. त्यात वेगळं असं काय आहे?कधी कधी हे प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण असतं. कधी ते भावनिक असतं तर कधी कधी ते या दोहोंच्याही पलीकडचं असू शकतं. पण असं आत्मिक प्रेम होण्याआधी मानवी मन अनेक अवस्थांमधून गेलेलं असतं . मनातल्या कामवासनांनी त्यात वेळोवेळी चातकाप्रमाणे भरच घातलेली असते. त्याला घुसळवून काढलेलं असतं.सतत या टोकापासून त्या टोकापर्यंत धाव घेणाऱ्या दोलायमान लंबकाप्रमाणे मानवी मन चंचल असतं. तहानलेलं असतं. चुंबकाप्रमाणे विजातीय ध्रुवाकडे ओढ घेणारं असतं.

या टोकाहून त्या टोकाला जाणारा मी लंबक अजुनी
काम-वासना मेघ गर्जना धरतीवर मी चातक अजुनी
विजातीय ही माया आहे, विजातीय हा मोह असावा
विजातीय मी विजातीय ते विजातीय मन चुंबक अजुनी

कवी मनाला याची स्पष्ट जाणीव आहे की मी तर अजुनही स्थिर न होऊ शकलेला लंबकच आहे. अजुनही मी सतत हलतच असतो. इच्छा वासना अजुनही उसळतच असतात. गर्जना करीतच असतात. मी अजुनही चातकाप्रमाणे तहानलेला आहे. माझं प्रियेवरचं प्रेम ही कदाचित विजातीय माया असू शकेल अशी प्रामाणिक कबुली कवी देत आहे. अशी प्रामाणिक कबुली फक्त कवीच देऊ शकतो कारण त्याचं काव्य म्हणजे जणू त्याच्या अंतर्मनाचा आरसा आहे. तिथे कुठलीही लपवाछपवी नसते, खोटेपणा नसतो आणि म्हणूनच त्याला काव्य म्हणतात.

जे जे नैसर्गिक आहे प्राकृतिक आहे ते सुंदरच असतं. म्हणूनच कळीचं फुल होणं जितकं नैसर्गिक आहे तितकीच एखाद्या षोडशेच्या मनात दरवळलेली मुग्ध प्रीत भावना नैसर्गिक आहे. ही मुग्ध प्रणयभावना पाहून हवेचं स्तब्ध होणं जितकं प्राकृतिक आहे तितकंच प्राकृतिक त्याला दाद देण्यासाठी आकाशाचं सळसळणं आहे.

या किशोरी कळीला कळू लागले
अंतरंगी कोणी दरवळू लागले
शांत आहे जरी भोवताली हवा
आज आकाशही सळसळू लागले

किरणांच्या उबेने, उन्हाच्या मोहरण्याने कळीचं उमलणे भ्रमरांच्या गुंजारवाने पाकळ्यांचं जागं होणं हा कळीचा स्वभाव आहे. पण फुलपाखरू हिरमुसल्यावर कळीचे उमलणे हे तर कळीचं प्राक्तन आहे.

ऊब रेशमी पांघरल्यावर कळी उमलते आहे
ऊन जरासे मोहरल्यावर कळी उमलते आहे
गुंजारव ऐकून पाकळ्या जाग्या झाल्या होत्या
फुलपाखरू हिरमुसल्यावर काली उमलते आहे

प्रीतीच्या पहिल्या स्पर्शाने जेव्हा ही मुग्धा बहरते डवरते तेव्हा प्रीतीचा दरवळ सगळीकडे पसरतो. फुलणं बहरणे दर्वळणे यांचा अनुभव तिने घेतलेला असल्याने तिने तिच्यासारख्याच मुग्ध कळ्यांना तोडू नये असे कवीला वाटते..म्हणून तो म्हणतो,
नकोस छेडू काळ्या फुलांना
नकोस दुखवू दवास आता
बहरलीस तू डवरलीस तू
तुझाच येतो सुवास आता

अशा या उमलत्या कळीच्या स्वप्नात जाणारा कुणीतरी वेडा असतोच. हा वेडा स्वतःलाही विसरतो . मग कसल्याही प्रश्नांची उत्तरे द्यायला तो कुणाचाही बांधील नसतो.
आता कुठे फुलांचे मी गीत गात आहे
आता कुठे फुलांच्या स्वप्नात जात आहे
आता नका विचारू मी कोण काय कुठला?
आता तिचा नि माझा हातात हात आहे!

तिचे मदिर मादक ओठ टपोरे तेजस्वी डोळे त्याला भुरळ घालतात पण कधी कधी असंही होतं की या शारीर सौंदर्याकडे त्याचं लक्षही नसतं. तिच्या अंतरीच्या तेजाची त्याला ओढ असते. म्हनुनयाची स्पष्ट जाणीवही तो तिला करून देतो.

तुला वाटते मदीर मादक ओठांवर मी मरतो
तुझ्या टपोऱ्या अन तेजोमय नयनांवर मी मरतो
जिकडे तिकडे राख पसरली कुठे निखारा नाही
पुन्हा एकदा आग लाव तू वणव्यावर मी मरतो

तो म्हणतोकी तुझ्या शारीर सौंदर्यावर मी आसक्त आहे हा तुझा भ्रम आहे . खरे पाहता तुझ्यातल्या तेजाची विजेची मला ओढ आहे. पण मला तर कुठे धुगधुगीही दिसत नाही . सगळीकडे राखच राख पसरलेली आहे.
कुठेही ठिणगी निखारा दृष्टीस पडत नाही, तू तुझ्यातला तो निखारा पुन्हा एकदा फुलव आणि ती आग पुन्हा एकदा लाव. मग वणवा पेटला तरी त्यात जळायला मी तयार आहे.
एका पुरुषाने स्त्रीकडून अशा धगधगत्या ठिणगीची अपेक्षा करावी आणि त्यातल्या आगीत मरायचीही तयारी ठेवावी ही कल्पना कौतुकास्पद आहे. कमीतकमी काव्यातून का असेना पण अशा वेगळ्या इच्छा सध्याच्या भोगलोलुप संस्कृतीत व्यक्त होतात हेही नसे थोडके.
मग अशा आगीच्या बरसण्याने हृदयाला जखमा झाल्या तरी त्याचा सुवास वेगळा असतो. तो ओळखायला तेवढंच संवेदनशील हृदयही असावं लागतं. असं संवेदनशील हृदय अशा जळजळत्या जखमांना नक्षत्रांचं देणं समजतं.

हृदय म्हणाले या जखमेचा सुगंध अगदी न्यारा आहे
जरी वाटला तुला विषारी मला मात्र बघ प्यारा आहे
नक्षत्रांचे लेणे हे तर नक्षत्रांचे आहे देणे
जखम कशाची ही तर वेड्या ! चमचमणारा तारा आहे.

अंधारात राहणं सहसा कोणालाच आवडत नाही पण कवी आणि कलावंत यांना हा अंधारसुद्धा प्रियच असतो. कारण श्यामल रजनीचा सहवास त्यांना अंधारातच लाभतो आणि या अंधारामुळेच तिच्यात दडलेला चांदणचुरा त्यांना दिसतो.
स्वतःच्या मनातला रित्या रिकाम्या मनातला अंधारही कवीला प्रियच असतो. त्यामुळेच तर त्याला कधी स्वतःत दडलेला कलाकार दिसतो तर कधी गुन्हेगार दिसतो. तर कधी निराकार परमेश्वर दिसतो.
अंधाराचा छेद घेण्यासाठी अंधाऱ्या घरात कधी कधी इवलासा धीट कवडसा शिरतो.

अंधाराचा वेध घेऊनी घरात आला
अंधाराचा छेद घेऊनि घरात आला
इवलासा कवडसा परंतु धैर्य केवढे
सूर्याकडूनी वेड घेऊनी घरात आला

या इवल्याश्या कवडशाचे धैर्य तरी केवढे? घनतिमिराचा नाश कराया सूर्याकडून तो वेड घेऊन येतो.

रात्रीच्या या अंधाराने जगास शांती बहाल केली
उधळण करुनी रातराणीने सुवास शांती बहाल केली
अंधाराला जणू काळिमा जो तो येथे फासत असतो.
अंधाराने चंचल हट्टी मनास शांती बहाल केली
वरील मुक्तकात अंधाराला जो तो कसा दूषणे देत असतो हे सांगितले आहे. पण या अंधाराच्या कृपेनेच रात्रीच्या वेळेस जग शांतपणे झोपू शकते. रात्रीच्या वेळी फुलणाऱ्या रातराणीला कोणी शापित म्हणते . पण काळ्याभोर दुलईत झोपलेल्या सृष्टीवर सुवासाची उधळण करणारी तिच्या झोपेलाही सुवासिक बनवणारी रातराणी शापित कशी असेल? म्हणूनच अंधाराला काळिमा फासणाऱ्याने हे विसरू नये की या अंधारानेच चंचल हट्टी मनास शांती बहाल केली आहे.

पण प्रकाश असेल तरच सारे काही दिसते असे नाही. कारण त्या प्रकाशाला पेलण्यासाठी आपली नजरच कधी असमर्थ असते. अस्तित्वाच्या भ्रामकतेच्या सीमारेषा ओळखायला फक्त बाहेरचा प्रकाश पुरेसा नसतो. स्वतःची दृष्टीही प्रकाशमय असायला हवी.

प्रकाशामधे सारे दिसते असेही नाही
नजरेच्या अखत्यारीत असते असेही नाही
अस्तित्वाच्या भ्रामकतेच्या सीमारेषा
जे नाही ते मुळीच नसते असेही नाही

आजूबाजूच्या गडद अंधारात दृष्टी कधी कधी जास्तच प्रखर बनते.
दृष्टी अशी प्रखर बनलीकी अंधाराचे भय वाटेनासे होते.

भय वाटत नाही अंधाराचे आता
भय वाटत नाही अंगाराचे आता
आतली शलाका पलश फुलांची दीप्ती
भय वाटत नाही संसाराचे आता

एकदा अंधाराचे भय वाटेनासे झालेकी मग संसारातल्या क्षुद्र गोष्टींचे भय वाटेनासे होते. अंधाराचा सराव व्हायला वेळ लागत असला तरी त्याच्या दिव्यत्वाची एकदा का महती पटली की मग अंधाराचा टिकावच लागत नाही. पण काहीजणांना सुखातही रडायचीच सवय असते मग दुःखात रडायची संधी ते का सोडतील?

अंधाराला जो तो येथे वेश्येसमही भोगत असतो
अंधाराच्या नावावरती जो तो येथे झोकत असतो
प्रकाशकिरणांना सामोरे जायाची ती हिम्मत नाही
अंधाराच्या नावाने का जो तो येथे कोकत असतो ?

भोगवादी अंधाराचा फायदा घेऊन जे भोगायचे ते भोगतच असतात. अंधाराची सबब पुढे करून झोकतच असतात. कारण प्रकाश किरणांना सामोरे जायची त्यांच्यात हिम्मतच नसते. म्हणूनच अंधाराच्या नावाने कोकलत राहून अंधारात राहणेच ते पसंत करतात.

अंधारावर भाळशील तू प्रकाश भाळत नाही
अंधाराशी सलगी करण्या प्रकाश सांगत नाही
दोष दिल्याने प्रकाशास का प्रकाश काळा पडतो?
अंधाराला चटावल्यांना प्रकाश भावत नाही

पण असं अंधारावरच भाळून तिथेच राहू इच्छिणाऱ्या कूपमंडूक लोकांवर प्रकाश कधीही भाळत नाही. प्रकाश अंधाराशी सलगी करा असे कधीही सांगत नाही.
फक्त अंधाराचा उपयोग सकारात्मक पद्धतीने करून घ्या दृष्टी तेजोमय करा असर तो सांगत असतो. म्हणूनच अंधाराला सरावलेल्याना चटावलेल्यांना सराईत निशाचरांना प्रकाश भावत नाही.
अशी ही अंधाराचा छेद घेणारी प्रकाशाचा वेध घेणारी सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त करणारी मुक्तके चांदणचुऱ्यात पानोपानी विखुरलेली आहेत. प्रतिभेच्या रूपात कवीच्या झोळीत चांदणचुऱ्याचं दान टाकणारी वाग्देवी शारदा एकदा प्रसन्न झालीकी या चंदन चुऱ्याने कवीची झोळी भरून जाते आणि तिला असणाऱ्या हजारो छिद्रातून रिकामीही होते.

कवीच्या झोळीतून गळून गेलेल्या चांदणचुऱ्याची लक्ष लक्ष झाडं उगवतात. बहरतात..लक्षावधी पानातून फुलातून चांदणचुराच उधळीत राहतात. ही झाडं स्वतःही बहरतात. इतरांनाही बहर देतात, मोहरलेली नजर देतात. तृप्तीने ओसंडणारे अधर देतात. आणि रसिकांकडून त्याचंच दान मागतात.

व्याकुळ माझ्या नजरेला दे नजर प्राशण्यासाठी
तृषार्त माझ्या अधरांना दे अधर प्राशण्यासाठी
वसंतात मी वसंतात तू वसंत अवतीभवती
मोहरलेल्या वृक्षाला दे बहर प्राशण्यासाठी
असं पानाफुलांनी बहरलेलं झाड जेव्हा आतून बाहेरून तृप्तीने ओसंडून वाहू लागतं तेव्हा आपल्या अस्तित्वाचंही त्याला ओझं वाटू लागतं. मग ओढ लागते समर्पणाची.

बोट तटाचे धरण्यासाठी येत राहिल्या लाटा
आत्मसमर्पण करण्यासाठी येत राहिल्या लाटा
ओझे अपुल्या अस्तित्वाचे होत असावे त्यांना
सरण्यासाठी विरण्यासाठी येत राहिल्या लाटा

सरण्यासाठी विरण्यासाठी लाटा तटाकडे जात राहतात.अहोरात्र विचार करणाऱ्या मनाचे विरणे खिरणे चालू होते. हृदयसरोवर शांत शांत व्हायला लागते. विकार वासनांच्या भिंती गळून पडतात. कैदेतून हळूहळू सुटका व्हायला लागते. ही जरी कवीकल्पना भासत असली तरी कधी कधी का होईना असं घडायला लागतं.

माझ्यामध्ये मुळीच आता मनास थारा नाही
अहोरात्र जो घोंगावे तो विचार वारा नाही
शांत सरोवर प्रशांत परिसर परिमल परमानंदी
बेड्या गळल्या भिंती पडल्या कैदी कारा नाही

हे सर्व का घडतं कसं घडतं, अचानक हे क्रांतीचं आणि शांतीचं वळण कुठून अवतरते? या प्रश्नांची उत्तरे मौन देते. कारण ही सारी तर मौनाचीच किमया असते. निःशब्द प्रार्थनेची किमया असते.

मला वाटते ही तर केवळ कवी कल्पना झाली
दीक्षा घ्यावी तशी वासना आज साधना झाली
कशामुळे ही क्रांती घडली वळण कोठुनी आले?
किमया केली मौनाने निःशब्द प्रार्थना झाली !

अशा या मौनातूनच सुरु होतो एक वेगळाच प्रवास एक वेगळाच प्रयास, स्वतःत खोल खोल उतरण्याचा.
हा प्रवास माझा मला शोधण्यासाठी
हा प्रयास माझा मला शोधण्यासाठी
मी खोल खोल माझ्यात उतरतो आहे
हाच ध्यास माझा मला शोधण्यासाठी

स्वतःचा शोध सुरु होतो तेव्हा आपणच आपल्यातून गळत जातो. हळूहळू आपण आपल्याला कमी दिसायला लागतो.
मी एकांताच्या पल्याड असतो आता
अन नीरवतेच्या स्वरात वसतो आता
शून्याच्या भिंती शून्याचे छत आहे
मी मला स्वतःला कमीच दिसतो आता
स्वतःचं दिसणं कमी कमी होत गेलं की , जाणीव होते की जोपर्यंत आरशात माझं प्रतिबिंब दिसतंय तोपर्यंत मी असणारच पण जेव्हा प्रतिबिंब आणि दर्पण एकरूप होतील तेव्हा मी सर्वांना दिसेन.पण मी त्यावेळी तिथे नसे.
आरशात मी असें तर मग दिसेन मी
प्रतिमा जोवर दिसेल तोवर असें मी
जेव्हा प्रतिबिंबाचेही होईल दर्पण
खरेच तेव्हा दिसेन मी पण नसेन मी

बहिर्मुख नजर आत वळवल्याशिवाय एकांताची भाषा कळत नाही.आकाशाची भाषा कळत नाही.

स्वप्नाची अन आभासाची कळू लागली भाषा
नीरवतेची एकांताची कळू लागली भाषा
नजरेने बदलली दिशा अन अंतर्गामी झाली
हळू हळू मज आकाशाची कळू लागली भाषा

नजर आत वळली आणि पक्षाची भाषा कळायला लागली. पण हे काही सहजासहजी घडलं नाही. त्यासाठी किती ठिकाणी ठेचा खाल्ल्या. कधी घसरलो. कधी पडलो. कधी स्वतःलाही विसरलो.

शोध जगाचा घेता घेता स्वतःस विसरत गेलो
संध्याछायांसमन मीही केवळ पसरत गेलो
मला वाटते शिखरावर उत्तुंग ठिकाणी आलो
यात्रा सरता सरता कळले घसरत घसरत आलो

चिमूटभर हवेवर जगणाऱ्या फुग्यासारखा मी, कुणी चार फुंकरी मारल्यावर मानवी स्वभावाप्रमाणे फुगलो आणि फुटलोही. फुगणं आणि विशाल होणं यातला फरक फुटल्यावरच कळला.
मूठ चिमूटभर वायूवरती हा जगणारा फुगा पहा
चार फुंकरीवरी भराभर फुगणारा हा फुगा पहा
उंच चालला गर्व वाढला अजूनफुगला … फुगला तो
क्षणभंगुर हे गर्वाचे घर हा फुटणारा फुगा पहा

जगण्याच्या धडपडीत हवं तसं जगता यावं म्हणून मी काय काय नाही केलं ? मी माझं नाव गाव बदलून पाहिलं. चेहऱ्यावर वेगवेगळे मुखवटे चढवले. तरी शेवटी काहीच नाही गवसलं. म्हणून शेवटी तळहातांवरच्या रेषांमध्ये स्वतःच नशीब शोध बसलो.
हां ! नाव गाव माझे बदलून पाहिले मी
अन मुखवटे हजारो चढवून पहिले मी
मी काय काय केले सांगू किती कुणाला?
तळहात आज दोन्ही उसवून पाहिले मी

कधी उन्हाजवळ सावलीची तक्रार केली. फुलांना दगाबाज भुंग्यांच्या गोष्टी सांगून स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा निर्मळपणा सिद्ध करण्यासाठी नको त्या लोकांपुढे व्यर्थ खटाटोप केला. पुन्हा नव्याने शिकारीचे मनसुबे रचले.
कशी सावली बेईमान ते उन्हास सांगत होतो
दगाबाज भुंग्यांच्या गोष्टी फुलास सांगत होतो.
निर्मळतेची ग्वाही देण्या खटाटोप मी केला
नव्या शिकारीचे मनसुबे स्वतःस सांगत होतो

हे सर्व करताना माझ्या मनाला अगणित वाटा फुटल्या. त्या भरकटत गेल्या. फरपटत गेल्या. त्याचे चेहरे वरून मोठे निरागस वाटले तरी अंतरी त्या कामाने बरबटलेल्या होत्या.
मन एक तयाला अगणित वाटा फुटल्या
सर्वच्या सर्व मग कुठे कुठे भरकटल्या
निष्पाप निरागस होते त्यांचे मुखडे
अंतरी वासना कामाने बरबटल्या

त्यातलीच एक बरबटलेली वाट मी पकडली. वर वर जरी साधुत्वाची वाटली तरी तीही तोतयाच होती. मग त्या वाटेवरला माझा प्रवास चकव्याचा होईल नाहीतर काय?
घरदार सोडुनी मी वनवासी झालो
कफणीने केले मी संन्यासी झालो
जी वाट निवडली वाट तोतया होती
मी चकव्यामधला एक प्रवासी झालो

अशा सर्व भटकण्याला कंटाळून मी शेवटी माझ्यामधल्या वासनांना गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. मग थोडाकाळ मला असं वाटलं की मी निष्काम झालो. पण हाय ! मी माझ्यातच कंबर खणून पुरलेल्या त्या वासना पुन्हा देहातून अंकुरल्या वर आल्या.
मी माझ्यामध्ये अनेक कबरी खणल्या
एकेक वासना गळा दाबुनी पुरल्या
निष्काम जाहलो झालो मी संन्यासी
पण हाय ! पुन्हा त्या देहातून अंकुरल्या

तृष्णांना गाडून टाकल्यावरही त्या अंकुरल्याने मी तृष्णेला प्राशित गेलो. घागरीने सागराने प्राशित गेलो पण तरीही तृष्णा काही मिटलीच नाही. टी वाढतच गेली.

तृष्णा तृष्णा म्हणता म्हणता घागर प्यालो
घागर घागर म्हणता म्हणता सागर प्यालो
तृष्णा माझी वाढत गेली … वाढत गेली अखेर सारी धरती प्यालो अंबर प्यालो

तरीही तृष्णा कमी झालीच नाही. हाही उपाय व्यर्थच गेला. मग मी करावे तरी काय? मग मी साधूंप्रमाणे ध्यानाला बसलो. ध्यान म्हणजे काय? मी कोणीतरी आहे या जाणिवेच्या पलीकडे जाणे म्हणजे म्हणजे ध्यान. मी ध्यान करू लागलो. त्यात रमलो. मग मला वाटायला लागले मी शुद्ध झालो, बुद्ध झालो. पण असं जेव्हा मला वाटलं तेव्हाच मला कळलं की मी पणाची जाणीव मला अजून सोडून गेलेली नाही. मी तर अजून आहे तसाच आहे. फक्त वयानेच वाढलो आहे.
ध्यान साधना करता करता शुद्ध जाहलो
मला वाटले खरोखरी मी बुद्ध जाहलो
विचार हा येताच मनी मज जाणीव झाली
अजून आहे तसाच केवळ वृद्ध जाहलो

‘मी’ आत वळलो असं मला वाटणं म्हणजे ‘मी’ अजून बाहेरच असणं नाही काय?
माणसातला हा ‘मी पणा ‘ म्हणजेच त्याचा अहंकार त्याच्या इतर इच्छा, वासना एकवेळ सहज संपूनही जातील पण अहंकार असा सहजासहजी नष्ट होत नाही. अहंकार हाच माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. सर्व दुःखांचे मूळ हा अहंकारच असतो.

मदिरेहुनही मादक आहे अहंकार हा
हलाहलाहून दाहक आहे अहंकार हा
जेव्हा त्याची ओळख पटते तेव्हा कळते
आत्म्याचाही भक्षक आहे अहंकार हा

कवी म्हणतो अहंकार हा मदिरेहून मादक आहे. म्हणजेच खोटी नशा उत्पन्न करणारा आहे. अशा भ्रमाला कोणी भाबडा भक्तीही म्हणेल पण तो तर भक्तीच्या म्हणजे समर्पणाच्या मार्गातला अडसर आहे. अहंकार हा हलाहलाहून दाहक आहे. हा अहंकारच आपलं अवघं तनमन जाळत असतो. जेव्हा अहंकाराची जाणीव स्वतःला होते तेव्हाच कळतं की, आपल्या आत्म्याचा भक्षक हा अहंकारच आहे.

आपल्यात असणाऱ्या ‘मी’ चे भरन पोषण आपणच करीत असतो. फक्त शब्दांचा अबीर उधळून किंवा ज्ञानोबा तुकाराम यासारख्या महान संतांच्या शब्दांची उसनवार करून फक्त पोकळ पांडित्य सिद्ध होईल. संतांचे शब्द जेव्हा आपण आचरणात अनु तेव्हाच अहंकृतीची सीमा आपण पार करू शकू,

तो मृत शब्दांचा अबीर उधळत असतो.
ज्ञानया तुका वा कबीर उधळत असतो.
पांडित्य तयांचे अहंकृतीची सीमा
तो शिबिरावरती शिबीर उधळत असतो.
माणसाजवळ स्वतंत्र प्रज्ञा असते. तर्कबुद्धी असते म्हणूनच तो स्वतःतल्या ‘ मी’ शी सतत युद्ध करत असतो. तर्कबुद्धी तर हवीच. त्याशिवाय भाबड्या अंध्दश्रध्दा नष्ट होत नाहीत.अतिरेकी तर्क संशयाकडे विनाशाकडे नेतो. भ्रमयुक्त भक्तीपेक्षा श्रद्धायुक्त भक्तीच परमात्म्याचं जवळ नेते.
चंदन चुरा या संग्रहात भक्त भक्ती परमेश्वर यांच्यापर्यंत नेणारी अनेक मुक्तके विखुरलेली आहेत. मानवी इच्छा वासना तृष्णा प्रेम यावर भाष्य करणारी मुक्तके आहेत. मानवी मनाची चंचलता, सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोन, समाजतले दैन्य दुःख हरवत चाललेली संवेदनशीलता यावं भाष्य करणारी मुक्तके आहेत. काही वेगळी वैशिष्ट्यपूर्ण मुक्तकेही आहेत. त्याचा थोडक्यात आढावा..
बीजाला इवल्या तरु बनवतो आहे.
मी मलाच माझा गुरु बनवतो आहे
या प्रवासात मी मालिन झालो आहे
मी पुन्हा मला लेकरू बनवतो आहे.

वृक्षावरती चढण्याची करू नको रे घाई
अथवा पत्थर मारायची करू नको रे घाई
धीर धीर धरी रे पिकल्यावरती आपसूक येईल खाली
कच्चे फळ तू चाखायाची करू नको रे घाई

ही धर्माची भुरळ म्हणूकी बाळकडू
परंपरेला अनळ म्हणूकी बाळकडू
हात पाय तोडून धडाचे संगोपन
संस्काराला गरळ म्हणू की बाळकडू

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे
रोज अत्याचार होतो आरशावरी अता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे

शेवटी का म्हणतो..
पैलतटावर नजर लागली प्रवास संपत आला
तेल संपले वाट न उरली प्रकाश संपत आला
जीवनभर बाहुले बनविले माझ्यामधल्या मी ने
सुटकेची चाहूल लागली विनाश संपत आला

बाहेरून तेलवात संपल्याची जाणीव झाली की ‘मी पणाची’ जाणीवही गाळून पडायला लागते.
रसिकांनी जे मागितलं ते देत राहिलो, निर्मितीचा आनंद घेतला. तो आनंद रसिकांना वाटण्यातला आनंद घेतला. अंतरीचे मधुघट जसजसे रिकामे करीत गेलो तसतसे ते पुन्हा पुन्हा भरत गेले आणि मनातलं निरागस स्वप्न फुल बनून दरवळायला लागलं.
अर्भकाप्रमाणे स्वप्न निरागस असते
तारका जशा ते तसेच तेजस दिसते
दाटवळते असे हे फुल निरंतर हृदयी
ते कधी अंबरी कधी लोचनी वसते.

या चांदणं चुऱ्यातील मुक्तक आणि रुबायांच्या प्रकाशात मला जे काही गवसलं ते कवीला जे काही गवसलं त्याहून वेगळंही असेल. कारण निर्मितीच्या वेळी कलावंताची असणारी भावस्थिती आणि त्याला जाणवलेला कलानुभव यापेक्षा आस्वादकाची भावस्थिती आणि कलानुभव वेगही असू शकतो. प्रत्येक व्यक्तिगणिक कलानुभव जसा बदलत जाती तास तो काळानुसारही बदलत जातो. एखादी कविता किंवा कथा बालपणी वाचून आलेला कलानुभव तरुणपणी किंवा प्रौढपणी आलेल्या कालानुभवापेक्षा खूप वेगळा असतो.

माझ्या दृष्टीला शक्य तितकं निर्मल बनवून त्या प्रकाशात मी ही मुक्तके वाचली, अनुजभवली, त्यांचा आस्वाद घेतला . जे जे वाटलं ते मांडत गेले अगदी सरळपणे कसलाही अभिनिवेश न बाळगता मांडत गेले.

कवीला प्रतिभेचं दान लाभतं आणि त्याच्या हृदयातून काव्य बरसात. या कवितेच्या पापण्या कश्या? तर जणू वळवानंतरच्या पागोळ्या ! या पागोळ्या प्रथम कवी टिपतो मग रसिकही टिपतात. आपल्या हळुवार ओठांनी ! अगदी कवीच्याच भाषेत सांगायचं तर असं सांगता येईल

नकोस सांगू सखी मला तू सरला चांदणचुरा
ओंजळ ओंजळ देत रहा ग मजला चांदणचुरा
वळवानंतरच्या पागोळ्या तशा तिच्या पापण्या
स्वतः इलाही’ अधराने मी टिपला चांदणचुरा ..

इलाही जमादार यांच्या गझलसंग्रहांची आस्वादात्मक समीक्षा वरून साभार…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.