किती द्यायचे मी तुझे सांग मजला
अता फेडुदेरे पुरे पांग मजला
नवे पंख भारी मला दो मिळाले
तुझ्या दर्शनाला नको रांग मजला
उसळते खिदळते गझल चित्रदर्शी
तिचा पूर्ण प्याला जणू भांग मजला
पुन्हा कुंडल्या या मुक्या मौन झाल्या
दवाने लिहूदेत पंचांग मजला
कुणी दूर गेले कुणी पार झाले
गझल देतसे ना कधी टांग मजला
खरा शुद्ध आत्मा तयाला शरण मी
जरी गूढ.. देतो तुझा थांग मजला
वृत्त – भुजंगप्रयात, मात्रा २०
लगावली – ल गा गा/ल गा गा/ल गा गा/ल गा गा/