काळी काळी, काष्ठे शिसवी, रचून न्यारा, बनला अपुला, एक बंगलो, स्वतःत रमण्या…
अनुपम चैत्यालय मनमंदिर, मूर्त पाहुनी, तीर्थंकर भक्तीत झिंगलो, स्वतःत रमण्या….
भक्तामर स्तोत्रातिल कडवी, अठ्ठेचाळिस, भक्तांसम कंठस्थ व्हावया,भक्ती केली…
दर्शन केले, पूजन केले, जिनदेवाचे, गुणानुरागी होत खंगलो, स्वतःत रमण्या….
धुवांधार पावसात न्हाउन, उभी रिंगणे, गोल रिंगणे, करून नाचत चिंब जाहलो…
वारीमध्ये, अभंग ओव्या म्हणता म्हणता, भजन कीर्तने करत रंगलो, स्वतःत रमण्या….
मातीमधुनी, अनेकरूपी अनेकरंगी, घट बनवूनी, सगुण मूर्त साकार कराया…
घटाघटांची खरीखुरी अंतरे जुळाया, दुभंगूनही त्यात दंगलो स्वतःत रमण्या….
गझला गाणी, गोष्टी कविता, लिहित वाचता, शब्दांसंगे मैत्री झाली, प्रीती झाली…
अशीच प्रीती भक्ती नाती माणसातली, बहरुन येण्या त्यात गुंगलो स्वतःत रमण्या….
गझल मात्रावृत्त (मात्रा ४८)