पाऊसधारा जश्या बरसती तसेच बरसावे शेरांनी
वीज कडाडून मेघ गरजती तसेच गरजावे शेरांनी
नीरक्षीराच्या घटाघटांतुन भूमीला अभिषेक कराया
ढोल वाजवीत घननीळाच्या करांस पकडावे शेरांनी
मनमयूराचा रंगपिसारा उलगडताना अर्थ भाव घन
जाणीवेतील शब्दास्त्रांना लयीत परजावे शेरांनी
अडगळ असूदे जुनी पुराणी ऊन द्यावया तिला श्रावणी
नेणीवेतील जिने बिलोरी चढून उतरावे शेरांनी
आभाळातून थेंब टपोरे जळात पडता तरंग उठती
तरंगातूनी सुख वाटाया लहरत पसरावे शेरांनी
जुगलबंदीच्या रंगी रंगुन निर्झर खळखळ खिदळत वाहे
हर्ष माईना मुठीत इवल्या तयास उधळावे शेरांनी
गझलकारिणीस नाव लिहाया मक्त्यामध्ये खास सुनेत्रा
हृदय जलावरी नाव सुगंधी तयात उमलावे शेरांनी
गझल मात्रावृत्त(मात्रा ३३)