फुले धरेवर जशी सांडती तश्या भावना सांडू आपण
काव्य रचूनी ताजे ताजे विचार सुंदर धाडू आपण
कर्म जरी प्राचीन जुनेरे स्वच्छ धुवोनी नेसू आपण
तेच सोवळे आहे मानून स्तुती जिनांची गाऊ आपण
जसा आपुला विचार उमटे तशी भावना उमलुन यावी
शब्दांमध्ये गुंफुन तिजला बुद्धीपूर्वक मांडू आपण
सरळ अर्थ काव्यातून दिसण्या सरळ सरळ अन सरळ बघूया
जरी वाकडे दिसले काही टाळून त्याला वाढू आपण
रांधायला वाढायला हवेशीर घर स्वच्छ असावे
देय माउली ताक कण्याही प्रसाद समजुन खाऊ आपण
गझल मात्रावृत्त (मात्रा ३२)