निळसर अंबर चाफा कोमल
कळ्याफुलांची झेप नि परिमल
झळके वनराई …
मोद विखरुनी ठाईठाई .. झळके वनराई …
चिंब चिंबल्या फांद्यांवरती
चिमणपाखरे किलबिलणारी
झुले लता जाई …
मोद विखरुनी ठाईठाई ..झुले लता जाई …
रानफुलांचा हळदी वाफा
तृणपात्यांचा हिरवा ताफा
गझलगीत गाई..
मोद विखरुनी ठाईठाई ..गझलगीत गाई
मुग्ध रक्तिमा अधरी गाली
भाळावर पूर्वेच्या लाली
सळसळे तराई..
मोद विखरुनी ठाईठाई ..सळसळे तराई …
टपटपत्या पानांचे वादन
ऐकूदे मज निर्झर गायन
नको फुका घाई ..
मोद विखरुनी ठाईठाई ..नको फुका घाई …