उधाणल्या सागरात तारू अजून माझे टिकून आहे
सुन्या तुझ्या भैरवीत कोणी उदासवाणी बसून आहे
दहा दिशा मोकळ्या मला या खुणावतो आसमंत सारा
नभात अभ्रे फुलून येता तयामधे मी भरून आहे
तहान तृष्णा तुला तिलाही कुण्या सुरांची तिलाच ठावे
मुक्या मुक्या लावणीतला हा तरूण ठेका रुसून आहे
तुझे नि माझे अगम्य नाते कुणास बेडी कुणास कारा
म्हणून वेड्या परीप्रमाणे झुल्यावरी मी पडून आहे
सदा तुझ्या आठवात कोणी नवीन तारा अपार गुंता
जुन्या नव्या गोंधळात पारा तसाच माथी चढून आहे
जळी स्थळी शोधले तुला मी धुरात काष्ठी कधीच नाही
म्हणून धोंडा बनून पायी अजाण मुक्ती अडून आहे
दिव्याप्रमाणे फुलाप्रमाणे शमा दिवाणी खुली सुनेत्रा
नमाज माझा तुझा नमोस्तु खरा तथास्तु स्मरून आहे
वृत् – हिरण्यकेशी, मात्रा ३२
लगावली – ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/ल गा ल गा गा/ल गा ल गा गा