ती साद माउची येता थरथरली काया सुंदर
गझलेच्या वृत्तामधुनी सळसळली काया सुंदर
जो उपजत फुलून आला तो अभिनय खराच होता
श्वासाला रोखुन धरता झरझरली काया सुंदर
भावना दाटुनी आल्या लेखणी हरवली होती
पण जवळ संगणक बघुनी टपटपली काया सुंदर
वादळी रात अवसेची घनमाला पिसाटलेल्या
त्या रात्री वीज बनोनी लखलखली काया सुंदर
मी फक्त ‘सुनेत्रा’ आहे मज नकोत बिरुदे कुठली
गुज सांगत लिहिता लिहिता खळखळली काया सुंदर
समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता-मात्रावृत्तः
८+८+८+४=२८मात्रा, लय: १४+१४=२८मात्रा