क्षमेने हृदय शांत होते खरे रे
खरे देव शास्त्र नि गुरू हे खरे रे
भिजुन मार्दवाच्या दवाने फुलाया
कळ्यांनी उठावे पहाटे खरे रे
पहाडाप्रमाणे खडी कृष्ण काया
झरे अंतरी आर्जवाचे खरे रे
जुना शब्द शुचिता नव्याने लिहूनी
धडे स्वच्छतेचे स्मरावे खरे रे
कळे सत्य जेव्हा मिटे भ्रांत सारी
तरी संयमाने जगावे खरे रे
अकिंचन्य तप त्याग धर्मी मुनींचा
असे पर्व उत्तम म्हणावे खरे रे
सुनेत्रा न जोडे दुवा बादरायण
तळी ब्रह्मचर्या झळाळे खरे रे
गझल अक्षरगण वृत्त
नाव भुजंगप्रयात
लगावली -लगागा / ४ वेळा मात्रा २०