जपात रमले ध्यानी रमले तप केले मी शब्द जाळुनी
राख जाहली मम् कर्मांची भाव भावना काव्य जाळुनी
हृदय जाहले शांत जलासम बिंब प्रकटले सुंदर माझे
आत्मस्वरूपी मग्न जाहले छळणारा मी भूत जाळुनी
गाळ साठला तळी जलाच्या ओंजळ भरते शुद्ध जलाने
नकाच फेकू दगड चुलीचे तुष्णा मिटली काष्ठ जाळुनी
जात पात इतुकी ना मोठी त्याहुन मोठे मैत्र सृष्टिचे
प्रीती आणिक मैत्री यातिल फरक जाणला प्रीत जाळुनी
जाळायाला आता जवळी फक्त राहिली ममता हृदयी
ममता जळण्यासाठी नसते सदैव तेवे धूप जाळुनी
गझल मात्रावृत्त (मात्रा ३२)