नेणिवेतिल सुप्त इच्छा जाणुनी ये
जे तुला मिळवायचे ते पाहुनी ये
अंतरातिल गूढ निर्झर नित्य वाहे
भावघन सामर्थ्य मिळण्या प्राशुनी ये
घे प्रवाहाच्या दिशेने लहर आतिल
आतल्या हाकेस सुमधुर ऐकुनी ये
मी कधीही रुग्ण नव्हते सजग होते
हे लढाऊ आर्जवाशी बोलुनी ये
मी क्षमाशिल संयमाने क्रोध त्यागे
मार्दवाशी मैत्र होण्या तापुनी ये
देहकाष्ठा वाळलेल्या शिस्त लावुन
ध्यानअग्नी पेटवूनी जाळुनी ये
कायशुचिता शौच नाही शुद्ध मन कर
विखुरलेली सत्य वचने चाळुनी ये
वृद्धता कळण्यास पिकल्या कुंतलांची
चेहऱ्याच्या सुरकुत्यांना वाचुनी ये
मम् अकिंचन आत्मरूपी पूर्ण ब्रम्ही
प्रकट व्हाया तू अहं तव त्यागुनी ये
गझल अक्षरगणवृत्त (मात्रा २१)
लगावली – गालगागा/ तीन वेळा