ज्योतीने मी ज्योत लावली ज्योत तेवण्या जीवांची
ज्योतीने या धरा उजळली प्रीत पेरण्या जीवांची
डोळस अंधांना नयदृष्टी देण्यासाठी ज्योत मिटे
काळोखाला टिकवुन ठेवे ठेव ठेवण्या जीवांची
करी कुंचला शशिकिरणांचा हाती सृष्टीच्याच असे
कैवल्याच्या भिजुन चांदणी कला रेखण्या जीवांची
मुनीमनासम नीर वाहते नावेमध्ये शीड उभे
रत्नत्रय प्राप्तीच्या मार्गी ध्वजा पेलण्या जीवांची
ऐक सुनेत्रा दो नयनांचे दो दल आता मिटुन पहा
मूर्त मनोरम सगुण सावळ्या निळ्या देखण्या जीवांची
गझल – मात्रावृत्त (३०मात्रा )