नवा विषाणू
कविवर्य केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) यांच्या नवा शिपाई या कवितेवर आधारित (विडंबन काव्य ) Parody Poem.
नव्या मनूतिल नव्या दमाचा शूर विषाणू आहे,
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे !
मी न जिवाणू फंगस बुरशी ; जीव न त्रस कुठलाही ,
पसरण्यास मज केल्या कोणी दिशा मोकळ्या दाही ?
प्रचंड आहे माझी झेप ,
काटेरी हा मम शिरपेच ;
तुम्हा सांगतो ठासुन हेच ,
विहारास मम कुंपण पडणे अगदी न मला साहे !
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे !
इकडे तिकडे चहूकडे मम भावंडे पोचली
थुंकी स्पर्श नि संसर्गातुन इथे तिथे वाढली
कोठेही जा रस्त्यावरती सुसाट वाहनधारी
स्वच्छ हवा अन पाण्यासाठी दंगल दारोदारी …..
स्वच्छ ठेउनी मनुज घरे ,
रस्त्यावरती थुंके रे ;
मास्क लावुनी अता फिरे ……
शिंक खोकला या मनुजांच्या वेगातुन मी वाहे !
कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे !
पूजितसे मी जंतूला… जंतूमधल्या जीवाला …
पिंडी ते ब्रह्मांडी म्हणूनी पूजी मी पिंडाला !
मी मी मी मी … ना मी करे ; गर्दीमध्ये सदा फिरे ,
अहंकार मज कधी न धरे …पुरून सर्वांना मी उरे …
राव रंक जे मज न कळे ,
उच्च नीच हे द्वयही गळे ;
दिवे लावुनी मी न टळे …
हात स्वच्छ ना धुवाल तर मग मुक्कामाला राहे !
कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे !
काळ न थांबे कोणासाठी तसाच मी पण पळतो ,
बला जरी मी मनुजांसाठी , सुटकेस्तव धडपडतो ;
सृष्टीसतीला श्वास मोकळा मुक्त घ्यावयासाठी …
लढताना मज मृत्यू यावा हेच शब्द मम ओठी …
जाईन मी मम गावास ,
धडा शिकवुनी मनुजांस ,
पडता औषधी पाऊस ,
पाऊसधारांमधे काळ मग चिंब चिंब नाहे !
कोण मला वठणीला आणू शकतो ते पाहे !