गगन चुंबण्या उभ्या खड्या
तुझ्याच अधरांवरुन कड्या
मस्त नाचतो घेत उड्या
खळखळ वाजत भरे घड्या
घालत भूवर पायघड्या
नीर झरा ग नीर झरा…
जळी तरूंचे सांगाडे
बाजुस शिंदीची झाडे
त्यावर मेघांचे वाडे
वीज कडाडुन ते पाडे
ढगातून कोणा धाडे
नीर झऱ्यास नीर झऱ्यास …
कधी करितसे शांत जला
बिंब दावण्या गवतफुला
उडवुन अंगावर पाणी
तृणपात्यांना चिंबवुनी
धावे दुडुदुडु दडादडा
नीर झरा ग नीर झरा…
वेलींभवती फेर धरे
वाऱ्यासम वेगात उडे
धोंड्यांवर पाडीत चरे
खडकांच्या जाळीत शिरे
स्वतःभोवती गोल फिरे
नीर झरा ग नीर झरा…
वेग देतसे हातांना
बांधुन घुंगुर पायांना
देई संगीत सृष्टीस
सहा ऋतूंच्या नाट्यास
स्वर्णतेज उधळीत हसे
नीर झरा ग नीर झरा…
कुटीत माझ्या बसून मी
लिहिते निर्झर गाणी मी
खिदळत नाचत वाचत ती
खिडकीतुन मम सुंदर रे
साद घालते तुला सई
नीर झऱ्या रे नीर झऱ्या…
द्वाड निर्झरा हूड निर्झरा
दिवा लाविते थांब जरा
सारवलेल्या स्वच्छ अंगणी
ध्यानासाठी बैस खरा
ऐक आतल्या हुंकारा
नीर झऱ्या रे नीर झऱ्या…