उगवले मातीतुनी वर कैक अंकुर हे नवे
बांधले गगनास जेव्हा नीर झुंबर हे नवे
नाचरी आली हवा अन सान रोपे डोलती
सज्ज ती करण्यास आता रोज संगर हे नवे
उतरले यानातुनी मी सावळ्या रेतीवरी
पाहता सागरतिरावर भव्य बंदर हे नवे
लागले धक्क्यास गलबत त्यात होती बासने
त्यातुनी मी उचललेले ग्रंथ सुंदर हे नवे
गगनचुंबी उंच शिखरे कळस त्यावर झळकती
त्यांसही दिसतोच पाया पूर्ण मंदिर हे नवे