रिमझिम झिमझिम बरसत वर्षत याव्या पाऊस सरी
नाचत खिदळत अंगावरती घ्याव्या पाऊस सरी
टपोर मौक्तिक जलदांमधले स्वप्नपरी वेचीते
ओंजळीतुनी नाजुक तिचिया याव्या पाऊस सरी
मेघ गडगडे वीज कडकडे राग गातसे भूमी
मृद्गंधाशी करीत गप्पा गाव्या पाऊस सरी
प्राजक्ताचा सुवास ओला भरून देहामध्ये
ओलेत्या पण चिंब भिजाव्या न्हाव्या पाऊस सरी
तप्त बाष्पयुत शुभ्र मेघना थंड होतसे जेव्हा
सजल मनाने कृष्ण घनांनी द्याव्या पाऊस सरी
लपाछपीचा खेळ उन्हाचा चाले छायेसंगे
इंद्रधनूच्या रंगांनी रंगाव्या पाऊस सरी
गाउन गाउन पाउसगाणी अधरपाकळ्या सुकता
गुलाब काट्यांच्या झारीने प्याव्या पाऊस सरी
मात्रावृत्त – २८ मात्रा