मनात माझ्या दडले होते
स्वप्न मला ते पडले होते
जरी संकटे धावुन आली
मनासारखे घडले होते
स्वतः स्वतःवर केली प्रीती
प्रेम स्वतःवर जडले होते
पहात होते मी खिडकीतुन
उंबऱ्यात ते अडले होते
पानगळीचा ऋतू सुखाचा
पान पान मम झडले होते
जिवंत होती मैनाराणी
पंख तिचे फडफडले होते
सांग प्रियतमा सुंदर सुंदर
रूप कुणाला नडले होते
कशा विजेची धरून हाती
मेघ नभी गडगडले होते
प्यास म्हणूकी तहान याला
वाद फुकाचे झडले होते
माय धावली काम टाकुनी
मूल सान धडपडले होते
गणपत वाणी बिडी प्यायचा
नशेत ते बडबडले होते
नजरबंद होताच नजर मम
हृदय हळू धडधडले होते
गुलाबजामुन जांभुळलेले
शर्करेत लडबडले होते
खरा सामना बलीप्रथेशी
मोह त्यात तडतडले होते
मोक्षाचे मी द्वार उघडता
कर्मदरिद्री रडले होते
तेल तापता तप्त ऊनही
फोडणीत तडतडले होते
सोंगाड्यांची बघून सोंगे
दुःख न मम भडभडले होते
चाळण नव्हती घरात जेव्हा
मी पोहे पाखडले होते
बाष्प होउनी नीर उडाले
मीन तळी तडफडले होते
आतम शुद्धी बघुन जिनांची
मायावी गडबडले होते
मला न उरले भय कसलेही
सत्य मला सापडले होते
वारा संपावर गेलेला
ढग वरती अवघडले होते
परिसर मजला बघावयाचा
जेथे मी बागडले होते
गझल मात्रावृत्त (मात्रा १६)