लुटेन संक्रांतीस गोडवा घरास माझ्या बरकत आहे
हृदयसागराच्या धक्क्यावर सुख शांतीचे गलबत आहे
मधुमेहाची कशास चिंता शरीर हलते चपळाईने
वाळ्याचे माठात सुगंधी जांभुळ रसना सरबत आहे
तिळातिळाने दिवस वाढुनी तिळातिळाने रात्र घटाया
मावळतीचा सूर्य केशरी दिशेस उत्तर सरकत आहे
कशास कोंडुन स्वतःस घेशी दगडी भिंतींआड पाखरा
उघड उघड रे द्वार चंदनी दक्षिण वारा धडकत आहे
मक्त्यामधले नाव सुनेत्रा निधान आनंदाचे अगणित
गझल संचितामध्ये अवघ्या करते स्वागत अलबत आहे