कधी कधी मी माझी आई कधी कधी चित्रातिल दादा
कधी खोडकर कृष्ण कन्हैया कधी कधी मी गोरी राधा
घननीळाच्या अधरांवरची जशी बासरी स्वरुप सुंदरी
तशीच मीही मुग्ध कुमारी प्रिय गझलेतिल रदीफ साधा
फिरव अशी जादूची कांडी स्वर अन व्यंजन सजीव व्हावे
शब्द असूदे पूर्ण रूप वा किंचित अधुरा अर्धा आधा
गझल बोलते मात्रांमधुनी सहज तरीही तोलुन मापुन
तिच्यात नसते अक्षरसुद्धा कधी कमी अन कधीच जादा
स्फटिकासम मम हृदय दावते प्रतिमा तुझिया भावक्षणांची
व्हावी कैसी सांग ‘सुनेत्रा’ तुजला त्या गर्वाची
मात्रावृत्त – १६+१६=३२ मात्रा