भन्नाट माझ्या काफियाच्या एकदा ओठात ये
जागेपणी जमले जरीना चोरुनी स्वप्नात ये
वाऱ्यापरी मन उधळते अन धूळ माती उडविते
माखून काया त्या धुळीने माझिया स्वर्गात ये
जाणून आहे आस भारी मी तुझ्या कवितेतली
तिज वाजण्या थंडी गुलाबी तू तिच्या देहात ये
सैलावल्या बघ मेघमाला गगन निळसर जाहले
भिजवावया पुन्हा धरेला श्वेत मम अभ्रात ये
आवाज पक्ष्यांचे गुटर्गू बास आता ऐकणे
ऐकावया कुजबुज खगांची जांभळ्या घरट्यात ये
नाकावरी जी खूण माझ्या रुक्मिणी शोधेल रे
जो राग नाचे अंतरी त्याच्याच तू शोधात ये
निर्वस्त्र तू दुःशासना झालास वस्त्रे फेकुनी
देणार वस्त्रे द्रौपदी तुज फाटक्या सदनात ये
भामा ‘सुनेत्रा’ चंचला ना ती सखी सौदामिनी
चुंबून अधरा मस्त तिचिया कृष्ण घन नेत्रात ये
अक्षरगण वृत्त (मात्रा २८)
लगावली – गागालगा/गागालगा/गागालगा/गागालगा/