भरूदेत प्याला पुरा हा गझलचा
सदा खळखळूदे झरा हा गझलचा
पुन्हा मी लिहावे पुन्हा सांडवावे
मला छंद जडला बरा हा गझलचा
गझल प्रेमगीता गझल आत्मरूपी
अता हात हाती धरा हा गझलचा
नव्या दीपकांच्या उजळण्यास ज्योती
मला साथ देई चिरा हा गझलचा
जरी कैक वृत्ते सुबक नेटकी ही
झगा त्यांस शोभे खरा हा गझलचा
भुजंगाप्रमाणे सहज सळसळे हे
असे रत्न सुंदर हिरा हा गझलचा
जरी सोलण्या ही गझल त्रास होतो
किती गोड आहे गरा हा गझलचा
वृत्त – भुजंगप्रयात, मात्रा २०
लगावली – ल गा गा/ल गा गा/ल गा गा/ल गा गा/