पृथ्वी धरती भूमी ताई करिते नावे धारण सुंदर
क्षमाशीलता तिची प्रकृती मौन घनासम पावन सुंदर
शुभ्र मोगरा पर्णदलातिल सुरभित कोमल तसे शब्द हे
मार्दव असते या कुसुमांसम तसेच बोलू आपण सुंदर
हृदयापासुन खरे बोलतो वचनांसम त्या कृतिही करतो
तोच खरा रे गुरू दिगंबर त्याचे आर्जव पालन सुंदर
शौच शुद्धता अंतःकरणी असते तेव्हा ते अतिमोहक
अश्याच मोही श्रमण रंगती दशलक्षण मनभावन सुंदर
भरत भूमिवर सदासर्वदा अभय मिळाया सर्व जिवांना
धर्म अहिंसा हेच सत्य अन मोक्ष-मुक्तिचे गायन सुंदर
निसर्गात या उपजत संयम इंद्रधनूसम रंगबिरंगी
क्षितिजावर आभाळ धरेच्या दर्शन देतो श्रावण सुंदर
सायीसम मृदु भावभावना विरजुन घुसळुन मिळते लोणी
त्याला कढवू घृत मिळवाया त्यासाठी तप आसन सुंदर
स्वभाव ओळख जीवा अपुला त्याग कराया परधर्माचा
अनेकान्तमय स्वधर्म आहे त्याचे कर तू पाठण सुंदर
आत्म्याला जे नाही हितकर त्याच्यासाठी कशास तंटा
अतिलोभाला बांधुन ठेवी अकिंचन्य व्रत बासन सुंदर
क्षमागूण हा पाया भक्कम ब्रम्हचर्य हा कळस त्यावरी
रत्नत्रय प्राप्तीसाठी हे शरीर आहे आसन सुंदर
मात्रावृत्त – ८+८+८+८=३२ मात्रा