जितुके दाहक तितुके मोहक माझे अडखळणे
म्हणती साधक नसते बाधक माझे अडखळणे
हळव्या कातर समयी भावुक प्रेमीजन म्हणती
हटके राजस करते पातक माझे अडखळणे
जल काचेतिल प्रतिबिंबासम काया झुळझुळता
झुलते झुंबर हलता लोलक माझे अडखळणे
वचने पेलुन शपथा झेलुन सांधे कुरकुरता
बनते नाजुक असली नाटक माझे अडखळणे
करण्या सावध मजला पाडुन पाणी खळबळता
भलते साजुक कडवे शोधक माझे अडखळणे
वृत्त – ल ल गा, गा ल ल, ल ल गा, गा ल ल, गा गा, ल ल ल ल गा.