आम्ही मेघ सावळे दाटता नभी अश्वांवर बसूनी
झिंगतो वात हूड वीज आसूड घुमवी कडकडा
उधळतात अश्व चौखूर आम्ही कोसळू धडधडा
कडा ओतेल मौक्तिके शुभहस्ते ओंजळीत भरूनी
धनधान्य पिकवतील ग्रामस्थ नीरास वळवूनी
भागवू तहान धरणांची सांडू लोळून गडगडा
व्हावयास बाष्प हलके तापून उकळू तडतडा
लहरण्या मुक्त विहरण्या मोदे वर जाऊ उडूनी
अदृश्य होऊन फिरू तारांगणी नक्षत्रफुले वेचू
गुंफून कृष्ण कुंतलात कुरळ्या रजनीच्या ती माळू
प्राशाया चांदणचुरा झराझरा झरणीतुनी गाळू
अंबरी शांत प्रहरी जलधुळी ध्यानस्थ झाड रेखू
वाटले जलदांपरी कोसळावे तरी राहू बसूनी
टपटपू दवबिंदूंसम पानी फुली नेत्रांमधूनी