म्हणशिल तू जर लिहिन कहाणी
कारण मीही आहे मानी
येशिल जेव्हा उकलुन गाठी
देइन तुजला साखरपाणी
वैशाखाने आज शिंपली
सुगंधजलयुत गुलाबदाणी
मृद्गंधाची धूळ टिपाया
हृदयी माझ्या अत्तरदाणी
मौन प्राशुनी तृप्त जाहली
फुलली हसली खुलली वाणी
मृदुल कोवळ्या शशिकिरणांची
माधुर्याने भिजली वाणी
मनात शुद्धी खरी असूदे
दिवानी वा लिही दिवाणी
प्रेमासाठी मत्सर प्याले
वेडी म्हण वा मला शहाणी
राज्य धरेवर तुझे ‘सुनेत्रा’
मुलाफुलांची तू तर राणी