मी तुझी नाही जरी रे मी तुझी आहे सदा
मौन मी आहे जरी रे बोलकी माझी अदा
संपदेचा भार होता सावळ्या कायेस या
चुंबिल्या मी पापण्या झुकवून माथा कैकदा
गोष्ट साधी बोलते मी पण चढे पारा तुझा
बोलताना तोल जातो साजना तव कैकदा
रंगला होतास तू अन रंगली होती निशा
आठवे मज चांदण्यांनी शिम्पलेली संपदा
लेखणीने कापते मी लेखणीने ठोकते
लेखणी समशेर सुद्धा आणखी माझी गदा
लिहित जाता शेर झरझर गझल नाचू लागते
भिजविते हर्षात मजला गझल माझी हर्षदा
का असे पळतोस वेड्या वेड पुरते लावुनी
मी पुन्हा प्रेमात पडते ठेच लागे लाखदा
ऐकली मी शीळ जेव्हा नाचऱ्या वेळूतली
जाहले होते तुझ्यावर त्याचवेळी मी फिदा
काय मी केला गुन्हा मज ना कळे रे आजही
शेर त्यांना पिडवती अन मीच ठरते आपदा
पेरले मी चांदणे अन घोस त्यांचे लगडले
झाड आता वाकलेरे या घडांनी लदबदा
कृष्ण तो घन बरसताना मृत्तिकेवर सावळ्या
विरघळे पाण्यात शीतल तापलेली ती मृदा
तोड सारी बंधने अन हो सखी तू मोकळे
जाण तू आता स्वतःला खुद्द म्हणतो तुज खुदा
पोलमीने तू रहावे तुज सुनेत्रा सांगते
भाकरी फुलण्यास पुरती मळ पिठाला तू हदा