लिहावी वाटते जेंव्हा कविता ..
तेव्हाच लिहावी असं काही नाही
कामे करता करताही लिहावी कविता एखादी ..
किंवा रस्त्यातून चालता चालताही …. लिहावी एखादी कविता..
कामे असतातच निकडीची …रोज रोजच्या जगण्याची…
ती तर करायलं हवीतच आधी…
त्यानंतर मग… लिहावीच एखादी मुग्ध कविता… वेळ काढून …मूड पाहून..
साठलेल्या भिजलेल्या शब्दांतून ,,उचलावेत काही शब्द…काही क्षण…
आणि लिहीत जावे परत परत…
कविता कधीच म्हणत नाही…वेळ काढ माझ्यासाठी…
फक्त माझी आठवण ठेव…म्हणत असते ..
गाण्यासाठी…गाण्यांसाठी…
तेच शब्द तेच स्वर त्याच भावना …….
पुन्हा नाही आल्या तरी…
खंत नसावी कसलीच उरी…
साठलेल्या भिजलेल्या सुकलेल्या …
आणि उडालेल्या शब्दांची… नव्या वर्षाची…
नव्या नवतीच्या नवेल्या नव्हाळीच्या क्षणांची….
गुंफत जावी मोतीमाळ….
पण …
माळेमधल्या मण्यांमध्ये
कधीच अडकत नाही काळ ……