गझल लिहावी की कविता मी प्रश्न मला ना पडे अताशा
लिहीत जाता स्फुटे मनातिल पाचोळा नच उडे अताशा
शांत शांत हृदयातिल पाणी कुणा न दिसती तरंग त्यावर
तरी स्तब्ध त्या सलिलावरती जिवंत नाते जडे अताशा
संपुन गेले भय उरलेले लगाम काळाचा तव हाती
त्यास बांधण्या सज्ज कपारी खुणावती मज कडे अताशा
अक्षत अक्षत धुवून सुकवुन पाणिपात्र मम भरता त्याने
कुंकुम भाली लखलख हसते कोर आणखी खडे अताशा
दृष्टीमधली फ़ुलवुन ठिणगी सुनेत्र माझे लक्ष्य भेदता
नीतळ काचांवरले अपसुक जुळून येती तडे अताशा
गझल मात्रावृत्त – ३२ मात्रा