त्या तिथे कोणीच नव्हते पण तरी ती भीत होती
आतला आवाज म्हणतो हीच मोठी जीत होती
मृदु निरागस भाव नयनी उंबराचे फूल जणु ती
पण तिला ठाऊक नव्हते ती स्वतः संगीत होती
अंतरीचा नाद दिडदा ऐकता हरवून गेली
हरवली पण गवसलेले शब्दधन सांडीत होती
मेघमाला भासली ती वाटिका फुलवून गेली
मेघमाला सावळी पण वाटिका रंगीत होती
मोकळे आभाळ करण्या घेउनी हाती सुई ती
कृष्णढग सारे नभीचे हळुहळू उसवीत होती
हाय मी दमले लिहोनी म्हण सुनेत्रा एकदा तू
गझल माझी व्योमगंगा मज खरी विनवीत होती
वृत्त -व्योमगंगा, मात्रा २८
लगावली – गा ल गा गा/ गा ल गा गा /गा ल गा गा /गा ल गा गा
One response to “व्योमगंगा – VYOMA GANGAA”
झक्कास नादब्रम्ह!