पर्वराज पर्युषण येता दशधर्मांना जपू अंतरी
निसर्गातला धर्म अहिंसा स्वधर्म मानुन बघू अंतरी
ज्या धरणीवर जगतो मरतो तिलाच आपण दूषित करतो
त्या पृथ्वीचा धर्म क्षमेचा निष्ठेने आचरू अंतरी
आत्म्यामधले मार्दव अपुल्या जगात साऱ्या कोमल असते
प्रेमभाव जीवांप्रति तैसे प्रेम पेरुया मृदू अंतरी
मन वचने कायेत सरळपण याला आर्जव जैनी म्हणती
कृतीत येण्या आर्जव सहजी मुनीमनासम फुलू अंतरी
आर्जव मार्दव क्षमागुणांनी शुचिता हृदयी प्रकट होतसे
शुद्ध शुचिर्भुत हृदयामध्ये ध्यानासाठी बसू अंतरी
आत्म्याला जे हितकारक ते सत्य जाणुनी बोलू ऐकू
कल्याणासाठी जीवांच्या ऐश्या सत्या भजू अंतरी
फुलांस घाई कधी न असते फुलावयाची मनुजासम या
पुष्पांसम संयमी होउनी मोक्ष फळाला धरू अंतरी
अनशन एकाशन करुनीया शरीरास विश्रान्ती देऊ
मौन घेउनी तपास बसुया शुद्ध जलासम झरू अंतरी
त्यागरूप धर्मास स्थापण्या मनवेदीवर स्वस्तिक रेखुन
त्यागूया दुर्गुण विषभरले गुणानुरागी बनू अंतरी
अकिंचन्य आत्म्याची मूर्ती सजवू सुंदर अकिंचनाने
अचल राहण्या सम्यग्दर्शन जिनवाणीला स्मरू अंतरी
सोलहकारण भाव अर्पुनी तीर्थंकररुप आत्मा होण्या
सहस्त्रदलयुत जिननामाचे पूर्ण ब्रम्ह प्रकटवू अंतरी
गझल मात्रावृत्त (३२ मात्रा)